लांजा विकास आराखड्याविरोधात आंदोलनाची तयारी?

लांजा : नगरपंचायत प्रशासनाकडून शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्याविरोधात शहर परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लवकरच नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांमधून सुरू झाली आहे.

लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा २७ मार्चला जाहीर करण्यात आला. या आराखड्यासंदर्भात साधारणतः वर्षभरापूर्वी बैठक लावण्यात आली होती. त्या बैठकीत नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रारूप विकास आराखडा अंतिम केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु २७ मार्चला नगरपंचायत कार्यालयात अचानक जाहीर करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवट तारीख २८ एप्रिल आहे. हरकती घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आल्याने आता अवघे १२ दिवस शिल्लक असताना नागरिकांची धावपळ उडाली आहे. आतापर्यंत ५०पेक्षा अधिक हरकतींचे निवेदन नगरपंचायत कार्यालयात प्राप्त झाले आहेत. तसेच जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये काही ठिकाणी गट नंबर देण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिटी सर्व्हे नंबर देण्यात आले आहेत.

बहुतांश नागरिकांना आपला गट नंबर माहिती आहे; परंतु सिटी सर्वे नंबर माहितीच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कालावधी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे सध्या नगरपंचायतमध्ये प्रशासकीय राजवट आहे.

लांजा शहराचा प्रारूप विकास आराखड्यात येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर ग्रीन झोन दाखवण्यात आला आहे. लांजा शहराचा ९० टक्के भाग हा ग्रामीण असून, येथील जमीनमालकांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढा देणार आहोत- परवेश घारे, माजी नगरसेवक, नेते शिवसेना ठाकरे गट

हा आराखडा आम्हा जनतेला अंधारात ठेवून केलेला आहे. या आराखड्याला आमचा तीव्र विरोध असून, आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. – राजू राणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 18/Apr/2025