संगमेश्वर : उपचार घेऊन घरी परतणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे देसाईवाडी येथील एका ७२ वर्षीय वृद्धाचा उपचाराहून घरी परतत असताना मृत्यू झाला. काशिनाथ भार्गव देसाई असे त्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ देसाई यांना दोन महिन्यांपासून थंडी आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांच्यावर जाकादेवी येथील डॉ. डिंगणकर यांच्याकडे उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.

उपचारानंतर ते घरी परतत असताना, पायवाटेने जात असताना त्यांना धाप लागली. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना वाटेत आंब्याच्या झाडाखाली बसवले आणि पाणी आणण्यासाठी घरी गेले. पाणी घेऊन परत आल्यावर त्यांना काशिनाथ देसाई जमिनीवर पडलेले दिसले आणि ते कोणतीही हालचाल करत नव्हते.

त्यांना तातडीने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 18/Apr/2025