राजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

राजापूर : जलजीवन मिशन योजनेच्या कामादरम्यान पाईपलाईनच्या खड्ड्यात पडून आपल्या गिर जातीच्या गाईचा मृत्यू झाल्याने नुकसानभरपाई न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सचिन सुधाकर बिर्जे (राहणार शिळ भंडारवाडी, तालुका राजापूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

या संदर्भात तहसील कार्यालयाला पाठवलेल्या निवेदनात बिर्जे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वाडीतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात पाईपलाईनच्या खड्डयात त्यांची गाय पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरी त्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. गाय घेण्यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून कृषी कर्जाअंतर्गत १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, जे गाय मेल्यामुळे ते फेडू शकले नाहीत.

आज या कर्जाची रक्कम १ लाख ७९ हजार ६५२.५४ रुपयांवर पोहोचली आहे. बिर्जे यांनी या सर्व परिस्थितीला तहसील कार्यालयाला जबाबदार धरले आहे. तहसील कार्यालयाने आपली जबाबदारी झटकून पशुधन विकास अधिकारी, राजापूर यांच्यावर ढकलली, तर पशुधन विकास अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी तहसील कार्यालयाकडून कोणतेही शासकीय आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले आहे. जलजीवन मिशनच्या कामाच्या ठेकेदाराची बाजू घेण्यासाठी शिळ गावचे विद्यमान सरपंच अशोक विठ्ठल पेडणेकर यांनी मदत केल्याचा आणि ग्रामस्थांची दखल घेतली नसल्याचा आरोपही बिर्जे यांनी केला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगून बिर्जे यांनी जलजीवन मिशनचे अधिकारी, पंचायत समिती पाणी विभाग, तहसील कार्यालय आणि शिळ गावचे सरपंच यांना आपल्या नुकसानीस जबाबदार ठरवले आहे. बँकेच्या कर्जाच्या तगाद्याला आणि शासनाकडून होणाऱ्या अन्यायाला कंटाळून येत्या १ मे २०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोकणातील पहिला शेतकरी म्हणून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करत बिर्जे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या या कृत्यामुळे भविष्यात त्रस्त लोकांना न्याय मिळेल आणि प्रशासनाला जाग येईल. या गंभीर इशारामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, यावर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 18/Apr/2025