चिपळूण : शहरातील पवन तलाव मैदानावर क्रिकेटच खेळवावे. या मैदानावर कबड्डी किंवा अन्य कोणतीही स्पर्धा भरवू नये, तसेच हेलिपॅड देखील पर्यायी ठिकाणी करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सचिव संदेश मोहिते यांनी केली आहे.
पवन तलाव मैदान हे ऐतिहासिक मैदान असून चिपळूण पालिका या मैदानाची देखभाल करत आहे. या मैदानावर कबड्डी किंवा अन्य स्पर्धा भरवण्यात येतात. शहरात खेडेकर क्रीडा संकुल असताना कबड्डी किंवा अन्य स्पर्धा या ठिकाणी का भरवत नाही? असा सवाल श्री. मोहिते यांनी केला आहे. खेडेकर संकुलात क्रीडा रसिकांना बसण्याची आसन व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. तरीही पवन तलाव मैदानावर कबड्डी किंवा अन्य स्पर्धांना परवानगी दिली जाते. पवन तलाव मैदानावर अन्य खेळ घेतल्याने त्याची क्रिकेटसाठी आवश्यक देखभाल करता येत नाही. मैदान अन्य स्पर्धांना दिल्याने क्रिकेटपटूंना सराव करता येत नाही. त्यामुळे या मैदानावर फक्त क्रिकेटच खेळवावे, अशी मागणी चिपळूण पालिकेकडे श्री. मोहिते यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी चिपळूण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी पवन तलाव मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची टर्फ खेळपट्टी तयार केली आहे. चिपळूण आमदार शेखर निकम यांनी टर्फ खेळपट्टी बनवण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. चिपळुणातील युवा टॅलेंटला मुंबई किंवा पुणे येथे जाण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी पवन तलाव मैदानावर उपलब्ध करून दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 19/Apr/2025
