रत्नागिरी : तीन तालुक्यातील ३६ दुर्घटनांची महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंद

रत्नागिरी : खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यात गेल्या वर्षभरात विद्युत क्षेत्रांतर्गत घडलेल्या ३६ दुर्घटनांची नोंद महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयात झाली आहे. २ मनुष्य जीवितहानीसह ९ प्राणी दगावले असून पीक व मालमत्ता जळित प्रकरणांचाही समावेश आहे. या बाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

खेड, दापोली व मंडणगड तालुके भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण, जंगलमय, डोंगर-दऱ्या, नद्यांनी व्यापलेली आहे. त्यामुळे सांगली-नाशिकसारख्या प्रशिक्षण केंद्रांमार्फत वीज कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासह वेळोवेळी सुरक्षा आढावा घेणे, सातत्याने जनजागृती करणे, सेमिनारमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्राणांतिक, अप्राणांतिक अपघातांसह व मालमत्ता जळाल्याच्या ३६ घटना घडल्या. या घटना विद्युत क्षेत्रासंबंधित असल्याची नोंद महावितरणच्या विभागीय कार्यालयात करण्यात आल्या आहेत.

यामध्ये मनुष्य प्राणांतिक अपघातांच्या घटनेत २ जणांचा बळी गेला. ३ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ९ प्राणी दगावले असून पीक जळाल्याची ९ प्रकरणे व मालमत्ता हानीच्या १३ प्रकरणांची नोंद आहे. संबंधित विभागाकडून पंचनामे झाल्यानंतर महावितरणच्या विद्युत क्षेत्रासंबंधित प्रकरणांचा अहवाल विद्युतनिरीक्षकांकडून तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तर जळित घटना टाळता येतील
महावितरणची विद्युतखांबापासून मीटरपर्यंत तर ग्राहकांची मीटरपासून घरातील उपकरणापर्यंतच्या वीज प्रवाहाची जबाबदारी असते. वीज वापरातील असामान्य स्थितीत स्वयंचलितपणे विद्युत प्रवाह तत्काळ बंद करणारे लघु सर्किट ब्रेकर, अर्थिंग वायर ट्रिप हे इलेक्ट्रिकल स्वीच प्रत्येक ग्राहकाने मीटर व घरगुती उपकरणांच्या बटणांशेजारी बसवायला हवेत. याद्वारे मालमत्तांच्या जळित घटना टाळता येतील, असे खेड महावितरण विभागीय अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 19/Apr/2025