हापूस महागल्याने चिपळुणात कर्नाटकी आंब्याना मागणी

चिपळूण : शहर बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक कमी असल्याने त्याचे दर अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसला पर्याय म्हणून बाजारात दाखल झालेल्या कर्नाटकच्या आंब्याला ग्राहकांची चांगली मागणी मिळत आहे. हातगाडीवर विकले जाणारे हे आंबे हापूसच्या तुलनेत स्वस्त असल्याने ग्राहक त्यांना अधिक पसंती देत आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला स्थानिक आंबा व्यावसायिकांकडे हापूस दाखल झाला असला तरी, तो केवळ काही ठराविक विक्रेत्यांकडेच उपलब्ध आहे. बदलत्या हवामानाचा फटका हापूसला बसल्याने यंदा त्याची आवक घटली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक जाहिरातबाजी करत असले तरी, आवक कमी असल्याने दर मात्र चढेच आहेत.

या परिस्थितीत, काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील लालबाग आणि बदामी जातीचे आंबे चिपळूणच्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. हे आंबे दरात परवडणारे असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. सध्या लालबाग आंबा १३० रुपये प्रति किलो, तर बदामी कर्नाटकी आंबा २०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता, येत्या काही दिवसांत कर्नाटकी आंब्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागणी जास्त असल्याने काही व्यावसायिक हापूसच्या नावाखाली कमी दरात कर्नाटकी आंबे विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 19-04-2025