चिपळुण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दीर्घकाळ रखडलेला चिपळूणचा उड्डाणपूल डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने सध्या कंत्राटदार कंपनीकडून वेगाने काम सुरू आहे. चार पिलरवर गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून आणखी ८ पिलरवर गर्डर चढवल्यानंतर पुलावर एकूण २४० मीटरचा पहिला काँक्रिटचा स्लॅब पुढील आठवडाभरात पडणार आहे. पावसाळ्यापूर्वी अर्धा पूल स्लॅबसह पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
महामार्ग चौपदरीकरणात पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरच्या चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत १,८४० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम ५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. परिणामी चौकशी समितीच्या अहवालानंतर पुलाचा आराखडा बदलण्यात आला. त्यानुसार पूल उभारणीत ४० मीटरच्या गाळ्यांचे अंतर कमी करून ते २० मीटरवर ठेवले गेल्याने अतिरिक्त पिलर उभारावे लागले. पिअर कॅप उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता गर्डर चढवणे सुरू आहे.
या पुलासाठी एकूण ९६ पिलरवर प्रत्येकी ८ याप्रमाणे एकूण ७६८ गर्डर चढवले जाणार आहेत. त्यामध्ये सध्या ४ पिलरवर गर्डर बसवून झाले असून आणखी ८ पिलरवर गर्डर बसवण्याचे सुरू आहे. एकूण १२ पिलरवर २४० मीटर लांबीचा आणि २५ मीटर रूंदीचा पहिला स्लॅब टाकण्याच्यादृष्टीने तयारी के ली जात आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी एकूण ९०० मीटरचा स्लॅब टाकून डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाणपूल पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 19-04-2025














