राजापूरात आता शिवसृष्टी साकारणार

◼️ माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी मंजूर

राजापूर : येथील जवाहर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून साकारल्या जाणाऱ्या शिवसृष्टीसाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात बोलताना मयेकर म्हणाले, “ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार उद्ध्वस्त करून त्यांच्या अत्याचाराला वाचा फोडली, त्याच ऐतिहासिक ठिकाणी ही शिवसृष्टी साकारणार आहे. राजापूरच्या इतिहासाला उजाळा मिळावा आणि महाराजांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवस्मारक समितीने याचा आराखडा तयार केला होता. यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतो.”

मयेकर यांनी सांगितले की, समितीने माजी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे याबाबत मागणी केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सध्या या निधीतून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. आज माजी आमदार जठार यांचा वाढदिवस असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यासाठी पुढील सहकार्यासाठी विनंती करण्यासाठी सर्व शिवप्रेमी येथे जमले आहेत.

राजापूर शहरातील नागरिक आणि शिवप्रेमींची ही मागणी होती की इंग्रजांच्या या वखारीचे सुशोभीकरण व्हावे. अनेक प्रयत्नांनंतर आमदार जठार यांनी लक्ष घालून दोन कोटींचा निधी मंजूर करून आणला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी या शिवसृष्टीसाठी आणखी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही दिले आहे, असेही मयेकर यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 19-04-2025