रत्नागिरी : रत्नागिरीत प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या एसटी बसमधून चालकाच्या बाजूच्या जागेत थेट आंब्याच्या पेट्यांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटीच्या मालवाहतुकीसाठी स्वतंत्र जागा असताना, अशा प्रकारे प्रवाशांच्या शेजारी आंब्याच्या पेट्या ठेवून वाहतूक होत असल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. एका जागरूक प्रवाशाने या प्रकाराचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.
रहाटाघर बसस्थानकावर रविवारी सकाळी एका प्रवाशाने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सामानासाठी म्हणजेच लगेजमध्ये आंब्याच्या पेट्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात चालकाच्या बाजूला असलेल्या जागेचा वापर यासाठी होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळी हंगाम सुरू झाल्यामुळे रत्नागिरीत एसटी बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई-पुण्याहून येणारे चाकरमानी परत जाताना आपल्यासोबत आंब्याच्या पेट्या किंवा बॉक्स घेऊन जातात. खासगी वाहतूक आणि पार्सल सेवा महाग असल्याने अनेकजण एसटी बसमधूनच आंबा घेऊन जाणे पसंत करतात. मात्र, पुरेशी काळजी न घेता आणि नियमांचे उल्लंघन करून अशा प्रकारे प्रवाशांच्या शेजारी मालाची वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या संदर्भात एसटी प्रशासनाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “एसटीच्या लगेज बॉक्समधून पेटी आणि पार्सल नेता येतात, मात्र बसमध्ये अशा प्रकारे प्रवाशांच्या सीटवर किंवा चालकाच्या बाजूला वाहतूक करण्यास परवानगी नाही. संबंधित विभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. यापुढे बसमध्ये पेटी अथवा पार्सल घेऊ नये, अशा सक्त सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देणे आवश्यक असताना, एसटी प्रशासनाकडून होत असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 21/Apr/2025














