रत्नागिरी : राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या कार्यरत राहणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. दरम्यान, शाळा स्तरावरील १२ समित्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.
शाळा स्तरावरील १२ समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याचाबतचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.
अशैक्षणिक कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षभरापासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती किमान १२ ते १६ सदस्यांची राहणार आहे. ७५ टक्के सदस्य बालकांचे आई वडील व पालकांमधून निवडले जाणार आहेत. शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिध्द सदस्य तर ५० टक्के महिला सदस्य समितीमध्ये राहणार आहेत.
समितीची दरमहा बैठक होणार असून दर दोन वर्षांनी समिती पुनर्गठीत करण्यात येणार आहे. शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान ३ महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करणे, बालकांचे हक्क समजावून सांगणे, पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे, शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे, बालकांची १०० टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे, अशी विविध कार्यशाळा व्यवस्थापन समितीची राहणार आहेत.
पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या समितीमध्ये १२ ते १६ सदस्य राहणार असून सरपंच किंवा नगरसेवक हे समितीचे अध्यक्ष तर स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी, शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेले शिक्षक, स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञ, समुपदेशक, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलिस पाटील, डॉक्टर, वकील, माजी विद्यार्थी, पालक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण) हे सदस्य तर मुख्याध्यापक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षा, १०० टके उपस्थिती, पायाभूत भौतिक सुविधा, शाळेला मदत, तक्रार पेटी, स्वच्छतागृहांची अंमलबजावणी, विशेष दुरूस्त्या यासह विविध गोष्टींवर या समिती भर देणार आहे.
कामांचे वर्गीकरण…
शाळा स्तरावरील समित्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, शिक्षक पालक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्वक्लॉफ स्वयंमूल्यांकन समिती या समित्यांचा समावेश शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तर शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समितीचे विलीनीकरण विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 21/Apr/2025














