चिपळूण नगर परिषदला सहकार्य करा, सुविधा देऊ अन्यथा कठोर कारवाई- मुख्याधिकारी विशाल भोसले यांचा इशारा

चिपळूण : चिपळूण शहरात यापुढे कोणत्याही परिस्थितीत उघड्या व सार्वजनिक वर्दळीच्या जागांवर मटण-मच्छी अथवा भाजी विक्री व्यवसाय करू दिला जाणार नाही. तसे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी, व्यावसायिकांनी मटण, मच्छी मार्केटच्या लिलावात सहभागी व्हावे. त्यांना सर्व सुविधा व सहानुभूती दिली जाईल. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कठोर भूमिकेमुळे शहरातील अतिक्रमणांचा बाजार उठला आहे. आता गेली अनेक वर्षे बांधून मात्र विनावापर असलेल्या मटण-मच्छी मार्केट, भाजी मंडई इमारतीमध्ये व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी भोसले यांनी नियोजन हाती घेतले आहे. त्यानुसार मध्यंतरात भाजी विक्रेत्यांची बैठक झाली तर २१ रोजी सांस्कृतीक केंद्रामध्ये मटण-मच्छी विक्रेत्यांची बैठक झाली. यावेळी शंभरहून अधिक व्यावसायिक उपस्थित होते.

अनेक व्यावसायिकांनी विविध समस्या आणि मुद्दे उपस्थित केले. हे सर्व मुद्दे समजून घेतल्यानंतर मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, यापुढे शहरात कोणत्याही पद्धतीने अनधिकृत व अतिक्रमण करून व्यवसाय करू दिला जाणार नाही. वेळ प्रसंगी पोलिस कारवाई केली जाईल. मात्र, जे नगर परिषद ला सहकार्य करतील त्यांच्याबद्दल सहानुभूती राहाणार आहे. नगर परिषद कडे व्यावसायिकांच्या संख्येनुसार व्यवसायासाठी आवश्यक जागा सध्या उपलब्ध नाही, ही बाब आपणाला माहीत आहे. तरीदेखील जास्तीत जास्त व्यावसायिकांना सामावून घेण्यासाठी नगर परिषद ची सहानुभूती राहील. प्रत्येक व्यावसायिक हा पोट भरण्यासाठी चिपळुणात येतो याची आपल्याला कल्पना आहे. अनेकजण गोरगरिब व्यावसायिक आहेत त्यांचे या व्यवसायावरच पोट आहे. तरीदेखील नियम डावलून कोणी न.प.चे ऐकत नसेल तर नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल. व्यावसायिकांनी गाळे लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, जे व्यावसायिक सहभागी होतील त्यांना नगर परिषद सर्व सुविधा आणि सवलती देईल.

मात्र, सहभागी न होणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सहभागी झालेल्या सर्वांनाच जागा उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र, जे राहतील त्यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविली जाईल. मात्र, अशा गोरगरीब व्यावसायिकांना डावलले जाणार नाही. मात्र, नियमाचा भंग करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई सुरू राहील.

ग्राहकांवरदेखील कारवाई होणार…
व्यावसायिकांनी मटण, मच्छी, भाजी विक्री करताना नागरिक व ग्राहकांना बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या देऊ नयेत. नागरिकांना स्वतः पिशवी आणण्याची सवय लावावी. तसेच वाया गेलेला माल आजूबाजूला नदीत टाकणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यातून श्वानांची संख्या वाढून श्वान नागरिकांचा पाठलाग करत आहेत. ज्या पद्धतीने प्लास्टीक पिशवीचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर ५ हजार रूपये दंडाची कारवाई होते त्याच पद्धतीने आता यापुढे वस्तू खरेदी करून प्लॅस्टीक पिशवीतून नेणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाईस लवकरच सुरुवात करणार असल्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक खाडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 22/Apr/2025