कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागा पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार संगमेश्वर दौऱ्यावर

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच कसबा संगमेश्वर दौऱ्यावर येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी कसबा येथे स्मारकाच्या नियोजित जागेची सखोल पाहणी केली. त्यांनी कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आणि कसब्यातील इतर पुरातन मंदिरांनाही भेट दिली.

या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत संपूर्ण दौऱ्याचे काटेकोर नियोजन सुसूत्रतेने उभे केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा केवळ स्मारकापुरता मर्यादित नसून, त्यातून संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना, स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हा दौरा म्हणजे एक सकारात्मक टप्पा असून, स्मारक हे केवळ इतिहासाची आठवण न राहता युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 23/Apr/2025