रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे. या मद्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. बेवारस स्थितीत आढळून आलेल्या या मद्यसाठ्याचा मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्यावर भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, जवान गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर लक्ष ठेवून आहेत. चिपळुणातील आंबतखोल येथील जंगलातील कुलूपबंद शेडमध्ये गोवा मद्याचे बॉक्स लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे यांच्याशी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून छापा मारण्याचे नियोजन केले. त्यानुसार निरीक्षक पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरिक्षक गणेश जाधव, सचिन यादव, जवान मानस पवार, वैभव सोनावले, मलिक धोत्रे यांनी मंगळवारी छापा मारला. जंगल भागात सुखकर्ता कात उद्योग कंपनीच्या पत्राच्या शेडमध्ये तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे तब्बल ३०० बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये इतकी असून हा मद्यसाठी जप्त करण्यात आला आहे. मद्यसाठ्याच्या ठिकाणी कोणीही आरोपी आढळून आलेला नाही. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भरारी पथकाचे निरिक्षक अमित पाडळकर यांच्याकडून केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 24/Apr/2025














