रत्नागिरी : चर्मालय येथे एसटीची दुचाकीला धडक; बस चालकावर महिन्याने गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील चर्मालय येथील चार रस्ता नाक्याजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक जखमी झाला. हा अपघात ११ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मजगाव ते मारूती मंदिर जाणाऱ्या रोडवर घडला. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दुचाकी चालक राहुल सुरेश तेरवणकर (वय ३६) हे ११ मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्युटी संपवून परटवणे येथून साळवी स्टॉपकडे त्यांच्या होंडा शाईन गाडी ( एमएच/०८/एसी/-५६५८) ने घरी जात होते. त्याचवेळी बस चालक जैनद्दीन महमदसाहब शेख (वय ४२) हा त्याच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच/१४/बीटी/-४४६१) ही मजगावकडून येत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालवत होता. त्याने राहुल तेरवणकर यांच्या दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल तेरवणकर जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार पोलीस हवालदार उमेश कृष्णा पवार यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपी एसटी बस चालक जैनद्दीन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि सह मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 24-04-2025