लांजा : माजळ- इसवली रस्ता लवकरच पूर्ण होणार

लांजा : माजळ-जावडे रावरी पनोरे-इसवली या १८ कि.मी. च्या रस्त्यापैकी दूरवस्था झालेल्या पाच ते सहा कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करा. अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद भारती यांना दिल्या.

लांजा-माजळ-जावडे-रावारी-इसवली पनोरे या रस्त्याची अतिशय दूरवस्था झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे; मात्र प्रत्येकवेळी आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत होती.

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २३) लांजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन येथील सहायक अभियंता अंकिता थोरात यांना जाब विचारला; मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर या सर्व ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांची लांजा रेस्टहाऊस या ठिकाणी भेट घेतली आणि रस्त्याबाबत असलेली आपली कैफियत त्यांच्या कानी घातली. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद भारती यांना सहा कि.मी. रस्त्याचे पुढील पंधरा दिवसांत डांबरीकरण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 25/Apr/2025