लांजा : लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत सार्वजनिक रस्ता नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे रस्ता नसताना डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेची खरेदी कशी केली, असा सवाल कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
लांजा नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प (घनकचरा प्रकल्प) प्रस्तावित आहे; मात्र तो लोकवस्तीपासून जवळ असल्याने त्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. चार वर्षांपासून ग्रामस्थांचा या विरोधात लढा सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले.
मुळातच या प्रकल्पाकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत व सार्वजनिक रस्ता असणे हे बाब महत्त्वाची आहे. तशी अट नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद आहे; मात्र असे असतानाही अधिकृत सार्वजनिक रस्ता आहे की, नाही याची खातरजमा न काताच या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून नगरपंचायतीने खरेदीखत केले आहे.
डंपिंग ग्राऊंडच्या जागेची खरेदी करताना रस्त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील (लांजा) दाखला जोडला आहे. या दाखल्यात नमूद केल्याप्रमाणे ग्रामीण मार्ग १७१ हा रस्ता जि. प्र. मा. ६३ म्हणजे जावडे रोड मार्गाच्या विरुद्ध दिशेता फुटून ४०० मीटरइतकाच आहे. त्यामुळे खरेदीखताला जिल्हा परिषद बांधकामचा दाखल्या जोडून खरेदीखत करणाऱ्या संबंधितांनी शासनाची दिशाभूल केली आहे. नियोजित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाकडे जाणारा सार्वजनिक रस्ता नसल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा व नगरपंचायतीकडून मिळालेल्या पत्रानुसार यापूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नावरून नगरपंचायत अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या सर्व चुकीच्या बाबींकडे दुर्लक्ष करून शासनाने जोरजबरदस्तीने डंपिंग ग्राऊंड प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात तीन जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर, संतोष कोत्रे, संदीप कोत्रे, दीपक खामकर आदी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
लांजा नगरपंचायतीने कोत्रेवाडी येथे डंपिंग ग्राउंडसाठी घेतलेल्या जागेकडे जाणारा रस्ता नसल्याने हे खरेदीखत झालेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. – सतीश पेडणेकर (डंपिंग ग्राउंड विरोधक)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 25/Apr/2025














