कोर्ले राजा गणेश मंडळाचे वतीने जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांचा सत्कार

लांजा : हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक अशी ओळख असलेल्या आणि ३० वर्षांची परंपरा असलेल्या तालुक्यातील प्रसिद्ध कोर्ले राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने
जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तर हिंदू -मुस्लिम बांधव हा उत्सव साजरा करत असल्याने त्यांचाही पोलिस दलातर्फे सत्कार करण्यात आला.

कोर्ले राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवाला ३० वर्षाची परंपरा कायम आहे. या उत्सवात मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी होवून आपली सेवा बजावत असतात. अशा या सार्वजनिक गणेशोत्सव कोर्लेराजाला जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा गणेशोत्सव मंडळाचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचाही सत्कार करण्यात आला. कोर्ले राजा मंडळाच्या गणेश उत्सवात हिंदु मुस्लिम धर्माचे बांधव एकत्र येत मंडळाच्या गणपतीची पूजा अर्चा करत असतात. ११ दिवस हळदी कुंकू, नेत्रदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम केले जातात.

दरम्यान, हिंदू मुस्लिम बांधव हा उत्सव साजरा करत असल्याने त्यांच्या एकात्मततेला मानवंदना देण्यासाठी पोलीस दलाकडून जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते कोर्ले सरपंच गणेश साळुंखे, मंडळाचे अध्यक्ष मनीष साळुंखे व उपसरपंच मुख्तार साठविलकर, पोलीस पाटील श्री. साटविलकर याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कोर्ले राजाला अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मिरवणुकीस सुरुवात झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गणेश भक्तांनी नाचत गुलाल आणि फटके वाजवत बाप्पाना निरोप दिला. विसर्जन मिरणुकीत हिंदु मुस्लिम बांधव जल्लोष करताना पहायला मिळाले. मंगळवारी सायंकाळी उशिरा जड अंतकरणाने कोर्ले राजाला निरोप देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 18-09-2024