मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उठलेले वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेनंतर आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) अत्यंत आक्रमक झाल्या आहेत. दूरचित्रवाणीवाहिन्यांवरील (टीव्ही डिबेट्स) चर्चा आणि सोशल मीडियावरून आपल्यावर चिखलफेक करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात चाकणकर यांनी आता थेट न्यायालयीन कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर, माजी नगरसेविका आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आशा मिरगे यांच्याविरोधात चाकणकर यांनी थेट कायदेशीर पाऊल उचलले आहे. मिरगे यांनी कायदेशीर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे चाकणकर यांनी माझगाव न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत. स्वतः चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत या कारवाईची अधिकृत माहिती दिली.
आशा मिरगे यांचे नेमके आरोप काय होते?
काही महिन्यांपूर्वी अशोक खरात याला महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर, खरातसोबत रुपाली चाकणकर यांचा एक पाद्यपूजेचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आला. या मुद्द्याचा आधार घेत आशा मिरगे यांनी चाकणकर यांच्यावर थेट आणि खळबळजनक आरोप केले होते.
चाकणकर या अनेक महिलांना स्वतःहून खरातकडे घेऊन जात असत, असा दावा मिरगे यांनी केला होता. एवढेच नव्हे तर, खरातच्या आर्थिक व्यवहारात आणि जमिनीच्या भागीदारीत काही आयएएस (IAS) व आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांसह रुपाली चाकणकर यांचाही थेट सहभाग असल्याचा आरोप मिरगे यांनी जाहीरपणे केला होता.
तीन वेळा नोटीस नाकारली; आता थेट कोर्टाचे समन्स
या सर्व आरोपांना उत्तर देत आपली बाजू स्पष्ट करताना माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “गेल्या दीड-दोन महिन्यांत कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अत्यंत असभ्य आणि अश्लील भाषेत आरोप केले गेले, जे मनाला अतिशय वेदना देणारे होते. या विकृतीला चपराक देण्यासाठी मी ४ एप्रिल रोजी आशा मिरगे यांना पहिली कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, कायद्याच्या भीतीपोटी त्यांनी ती स्वीकारली नाही. पोस्टाद्वारे तब्बल तीन वेळा पाठवलेली नोटीस ‘अनक्लेम’ (Unclaimed) म्हणून परत आली. अखेर मी माझगाव न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने याची तात्काळ दखल घेत आशा मिरगे यांना २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.”
“माझा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी” – चाकणकर
अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा जमिनीच्या वाटणीशी आपला दूरान्वयानेही संबंध नसल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. इतर हजारो भाविकांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाने खरातला केवळ एक आध्यात्मिक गुरू मानले होते आणि तो पाद्यपूजेचा व्हिडिओ अत्यंत जुना आहे, जेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षही नव्हत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा म्हणूनच मी स्वतःहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तरीही माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले. एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून माझे खोटे व्हिडिओ बनवले गेले. हा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे, जिथे संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत लोकांनी केला आहे. २ जुलैला मी स्वतः माझगाव कोर्टात आणि दिल्ली हायकोर्टात उपस्थित राहून हा लढा लढणार आहे. हा लढा इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नयेत यासाठी, म्हणजेच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आहे.”
दिल्ली हायकोर्टाकडूनही इतर महिला नेत्यांना नोटिसा
या प्रकरणात केवळ आशा मिरगेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील इतरही काही महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जाहीर टीका केली होती. या सर्वांचा उल्लेख करत चाकणकर यांनी सांगितले की, पुराव्याशिवाय वक्तव्ये करून राजकीय चिखलफेक करणाऱ्या इतर सर्व संबंधित महिला नेत्यांनाही दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाकडून कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हे न्यायालयीन प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 10-06-2026














