राजापूर : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यास सज्ज रहा – प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन

राजापूर : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करीत सज्ज राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रशासनाला दिल्या. त्यांनी संभाव्य आपत्ती, भूस्खलन, पूरस्थिती आदींविषयी सविस्तर माहिती आणि उपाययोजनांचा राजापूर, लांजा तालुक्याचा संभाव्य नैसर्गिक आपत्ती आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली काल येथील प्रांत कार्यालयामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील विविध विभागांचा प्रशासकीय आढावा बैठक झाली. बैठकीला राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, नायब तहसीलदार दीपक कुळ्ये, गटविकास अधिकारी नीलेश जगताप आदी उपस्थित होते.

बैठकीत नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि त्यावरील उपाययोजना आदींच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अर्जुना खोरनिनको धरणाच्या येथे पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले.

चर्चेवेळी कार्यालयांमध्ये आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याच्या सूचना डॉ. जैस्मिन यांनी दिल्या.

उपसलेल्या गाळाबाबत लवकरच निर्णय
शहरामध्ये निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अर्जुना कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू आहे. हा गाळ नदीकाठावर ठेवण्यात येत आहे. याकडे राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीमध्ये प्रशासनाचे लक्ष वेधले. उपसा झालेला गाळ आणि नदीपात्रातून झालेली

गाळाची वाहतूक यासंबंधित सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी स्पष्ट केले.

राजापूर आगारासमोर वाहतुकीसाठी उपाययोजना
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर डेपोसमोरील भागामध्ये वाहनांची वर्दळ वाढली असून या ठिकाणी सर्वबाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे संबंधित विभागासोबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. जैस्मिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 28/Apr/2025