दापोली पाठोपाठ चिपळूणमध्ये तीन पाकिस्तानी महिलांचे वास्तव्य

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी दापोलीत पाकिस्तानी नागरिक आढळल्याच्या घटनेनंतर आता चिपळूणमध्ये तीन पाकिस्तानी महिला वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महिला विवाह करून येथे ‘बहु’ (सून) म्हणून नांदत आहेत. त्यांच्या दीर्घकालीन व्हिसामुळे (लॉन्ग टर्म व्हिसा) त्या २०२९ पर्यंत वेगवेगळ्या वर्षांनुसार भारतात राहू शकणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांनी चिपळूणमधील स्थानिक पुरुषांशी विवाह केला आहे. यापैकी दोन महिलांनी त्यांचे मूळचे पाकिस्तानी नागरिकत्व सोडले असून, आता त्या भारतीय नागरिक बनल्या आहेत. तर, एक महिला अद्यापही पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजते. या तिघींचाही व्हिसा दीर्घ मुदतीचा असून, एकाचा व्हिसा २०२६ मध्ये, दुसऱ्याचा २०२७ मध्ये आणि तिसऱ्या महिलेचा २०२९ मध्ये समाप्त होणार आहे.

जिल्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्य शासनाला पाठवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक कुठे-कुठे वास्तव्यास आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील या माहितीचे संकलन करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे देशात नेमके किती पाकिस्तानी नागरिक राहत आहेत, याची माहिती केंद्र सरकार गांभीर्याने घेत आहे. देशभरात सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 28/Apr/2025