चिपळूण : परिश्रमाशिवाय यशाला शॉर्टकट नाही. त्यामुळे कष्ट करा, यश नक्कीच मिळेल, असा सल्ला दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी दिला.
नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात डॉ. भावे बोलत होते. या वेळी यूपीएससी परीक्षेत ३७८ वी रैंक मिळवून यश प्राप्त करणारा डीवीजेचा माजी विद्यार्थी सिद्धार्थ जैन, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य सी. सी. आठवले, उपप्राचार्य डॉ. आर. एम मोरे, कुलसचिव अनिल कलकुटकी, विद्यापीठ परीक्षा समन्वयक एस. के. नामदास यांच्यासह सर्व संचालक व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना डॉ. भावे म्हणाले की, पैशाने पैसेवाला होता येते. पण श्रीमंत होता येत नाही. पैशाने कार विकत घेता येते, संस्कार नाहीत. पैशाने समृद्धी, संपन्नता येईल, पण समाधानाचे काय? आई वडील, गुरु यांचा सन्मान करा.
देह आणि देव याच्यामध्ये देश आहे, याच भान कायम ठेवा आणि देशाला कधीही विसरू नका, देशाला उन्नत करण्यासाठी मेहनत घ्या, आयुष्यात मोठे व्हायचं असेल, तर सेलिब्रिटींकडे बघून मोठे व्हायला शिका. खऱ्या अर्थाने शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल, संस्कार करायचे असतील, तर गुरुकुल पद्धतीकडे वळायला हवं.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मोबाईल बाजूला ठेवा. आई-वडिलांना कधीही विसरू नका, आई-वडील गेल्यानंतर आपल्याला खऱ्या अथनि त्यांची किंमत कळते, असे त्यांनी सांगितले.
आपला देश हा संस्कृतीवरून ओळखला जातो. त्यामुळे संस्कृती विसरू नका, आईस्क्रीम वितळायच्याऐवजी ते खाणं योग्य, असे मानणारी आजची पिढी, परंतु मेणबत्तीसारखं हळुहळू जळून इतरांना प्रकाश द्या, अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.
ऐकायला शिका, विचार करून बोलायला शिका, खूप अभ्यास करा, कधीही मैदान सोडू नका, अपयश हा शब्द आपल्या शब्दकोशात ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.
या वेळी डीबीजे महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये टॉपर्स असणाऱ्या ३३ विद्यार्थ्यांचा डॉ. भावे, सिद्धार्थ जैन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. सिद्धार्थ जैन याचे वडील पारसलाल जैन व आई निर्मला जैन यांचाही सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाची एमएससी झूलॉजीची विद्यार्थिनी मानसी सुहास करंदीकर हिने मुंबई विद्यापिठात सुवर्णपदक पटकावत स्वातंत्र्यवीर सावरकर पारितोषिक पटकावले. डॉ. भावे यांच्या हस्ते तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक प्राचार्य माधव बापट यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडताना गेल्या साठ वर्षात महाविद्यालयाने विविध क्षेत्रात मिळवलेले यश, याचीही ओळख करून दिली. सिद्धार्थ जैन याचा परिचय श्रीराम दांडेकर यांनी करून दिला.
या वेळी बोलताना सिद्धार्थ जैन याने चार वर्षे मेहनत घेतल्यानंतर मला हे यश मिळाल्याचं सांगितले, शिस्त आणि मेहनत हे आवश्यक गुण असल्यास देशातील सर्वात कठीण असणारी यूपीएससीची परीक्षा क्रॅक करता येते, असेही त्याने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 28/Apr/2025














