राजापूर : राजापूर तालुक्यातील पाचल-ताम्हाणे मार्गावर काल (रविवार, २७ एप्रिल) सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास एस. टी. बसची एका डंपरला जोरदार धडक बसली. तळवडे धनगर वाडी येथील उतारावर ही घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी बस चालकावर बेदरकारपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालक संजप्पा शिवाजी मनशेट्टी (वय ३५, रा. तुळजापूर, धाराशिव) याने पाचल-ताम्हाणे मार्गावर आपल्या ताब्यातील एस. टी. बस (क्रमांक नमूद नाही) निष्काळजीपणे चालवत असताना उतारावर समोरून येणाऱ्या आयशर डंपरला (एम एच ०६ बी डी १०६२) धडक दिली. या धडकेत डंपरचे मोठे नुकसान झाले.
या घटनेबाबत डंपर चालक लक्ष्मण सुरेश मालोंडकर (वय ३२, रा. मालवण, सिंधुदुर्ग) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी बस चालक संजप्पा मनशेट्टी याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 28/Apr/2025














