चिपळूण : शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या गटारातून बेशिस्त नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्या टाकून देण्याची बेफिकीर वृत्ती सुरूच ठेवल्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच गटारात साचून पाणी तुंबण्याच्या प्रकाराबरोबरच डासांच्या प्रजातीमध्ये वाढ होत आहे. शहरात प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर टाकू नयेत यासाठी विविध ठिकाणी लोखंडी जाळ्यांचे बकेट बसविले आहेत. तरीदेखील अनेक बेजबाबदार नागरिक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गटारात फेकत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील गटारांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच नगर परिषदेला स्वच्छता मोहीमेंतर्गत दर पंधरा दिवसांनी काढावा लागतो. प्रामुख्याने मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक परिसर व बाजारपेठ वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटारातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीकच्या बाटल्या टाकण्याचा प्रकार बेफिकीर नागरिकांकडून सुरू आहे. बहुतांश शहरात खरेदीला आलेल्या नागरिकांकडून हे उद्योग केले जात असल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी आलेले नागरिक शितपेये व थंड पाण्याच्या बाटल्या खरेदी करून रस्त्यावरून चालत जात असताना पेय वा पाण्याचे सेवन केल्यानंतर रिकाम्या बाटल्या गटारामध्ये फेकून देत आहेत.
काही सुज्ञ नागरिकांकडून रिकाम्या बाटल्या मात्र चौकातील किंवा बाजारपेठेतील जाळीच्या बॉक्समध्ये टाकून सभ्यता पाळली जात आहे. परंतु अनेक बेजबाबदार व वेशिस्त नागरिकांकडून रिकाम्या बाटल्या गटारामध्ये टाकण्यात येत आहेत. त्यामुळे दर आठ ते दहा दिवसांनी गटारातील पाणी तुंबून डासांची उत्पत्ती होत आहे. ही गटारे साफ करण्यासाठी न.प.ला महिन्यातून दोन ते तीनवेळा नियोजन करावे लागते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 29/Apr/2025















