रत्नागिरी : निरूळ येथे सापडलेल्या बांगलादेशीयांची मायदेशी होणार रवानगी

रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशीयांची १५ मे रोजी बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा १४ मे रोजी संपणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी बांगलादेश-भारताच्या बॉर्डरवरील सुरक्षायंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवादीविरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ ला एक माहिती मिळाली होती. पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत, या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले, तपासात त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करून राहत असल्याबाबत खात्री झाली. त्याआधारे रत्नागिरी पोलिस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशो व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांच्या विरोधात मुदतीमध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले. त्यांची गेल्या महिन्यात सुनावणी होऊन रत्नागिरीचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ आरोपांना प्रत्येकी सहा महिने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. १४ मे २०२५ मध्ये १३ बांगलादेशीयांची शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यांना लगेच दुसऱ्या दिवसापासूनच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. शासकीय परवानगीनंतर पोलिसांचे एक पथक या १३ बांगलादेशीयांना सीमेवरील बीएसएफच्या ताब्यात देणार आहे.

बांगलादेशीय नागरिकांची नावे :
वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल होजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हवरतअली शेख, बाकिविलाह अमिर हुसेन सरदार, सैदर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरुद्वामन मोरोल वालायत अली, मोहम्मद लालतू मोदल किताब अलीस, अशी नावे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 29/Apr/2025