रत्नागिरी : सिमेंट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘श्री केशव सिमेंट इन्फ्रा लिमिटेड’तर्फे रत्नागिरीत नुकतेच एका भव्य चॅनल पार्टनर मीटचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या विशेष मेळाव्याला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील डिलर्स, वितरक आणि कंत्राटदारांनी मोठा प्रतिसाद दिला. रत्नागिरी जिल्ह्यात अल्पावधीतच आपले भक्कम स्थान निर्माण करण्यात कंपनी यशस्वी ठरल्याबद्दल, सर्व भागीदारांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवत्ता अत्यंत दर्जेदार; उद्योजक सौरभ मलुष्ट्ये व गिरीश सरदेशपांडे यांची ग्वाही :
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे नामांकित उद्योजक व नगरसेवक श्री. सौरभ मलुष्ट्ये तसेच प्रसिद्ध व्यावसायिक श्री. गिरीश सरदेशपांडे उपस्थित होते. आपल्या मनोगतात सौरभ मलुष्ट्ये यांनी सांगितले की, “एक उद्योजक म्हणून मी स्वतः केशव सिमेंटचा प्रत्यक्ष वापर केला असून त्याची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट व टिकाऊ आहे.” तसेच हे सिमेंट रत्नागिरीमध्ये सर्वत्र अतिशय माफक दरात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश सरदेशपांडे यांनीही स्वतःच्या बांधकाम अनुभवातून या सिमेंटच्या दर्जेदारपणाची आणि सकारात्मक परिणामांची साक्ष देत सिमेंटच्या मजबुतीचे कौतुक केले. याप्रसंगी रत्नागिरीचे तरुण उद्योजक श्री. अभिषेक सुर्वे हेदेखील विशेषत्वाने उपस्थित होते.

कंपनीचा गौरवशाली इतिहास व भविष्यातील वाटचाल :
कार्यक्रमादरम्यान केशव सिमेंटचे रत्नागिरी जिल्हा डिस्ट्रिब्युटर श्री. नरेंद्रभाई पटेल यांनी मार्गदर्शन करताना, भविष्यात केशव सिमेंट ग्राहकांसाठी आणि बांधकाम क्षेत्रासाठी कसे अधिक फायदेशीर ठरणार आहे, यावर सविस्तर प्रकाश टाकला. कंपनीचे डीजीएम (DGM) श्री. राजशेखर यांनी कंपनीच्या वाटचालीचा व गौरवशाली इतिहासाचा आढावा सादर केला. यावेळी कंपनीचे मार्केटिंग हेड श्री. अभय देशपांडे आणि सेल्स मॅनेजर श्री. हेमंत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिलर्स व कंत्राटदारांचे मानले आभार :
रत्नागिरी जिल्ह्यात ग्राहकांच्या विश्वासावर केशव सिमेंटने झपाट्याने प्रगती केली असून, या यशात जिल्ह्यातील डिलर्स आणि कंत्राटदारांचा वाटा मोठा असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी केशव सिमेंटचे रत्नागिरी जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. महेश लाळीकर यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, डिलर्स, कंत्राटदार आणि मान्यवरांचे आभार मानले. उपस्थितांच्या मोठ्या सहभागामुळे हा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.













