रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये शिकून विविध शासकीय पदांवर नियुक्त झालेल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यवाह सतीश शेवडे, विश्वस्त रवींद्र तथा मुन्ना सुर्वे, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर आणि अकादमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर-मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेच्या सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात कनिष्क कुरतडकर (लिपीक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक), कामिनी कार्लेकर (कॉन्स्टेबल, मुंबई पोलिस), नेहाल गमरे (आरोग्यसेवक), प्रथमेश पावसकर (आरोग्यसेवक), रितेश चव्हाण (आरोग्यसेवक), श्रेया लिंगायत (महसूल सहाय्यक, एमपीएसी), सानिका लिंगायत (ब्रॅंच पोस्टर मास्टर), शार्दूल नागवेकर (कार्यकारी सहाय्यक), सायली कांबळे (कार्यकारी सहाय्यक) यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी विश्वस्त रवींद्र तथा मुन्ना सुर्वे म्हणाले की, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, आयपीएस, आयएएस यामध्ये रत्नागिरीचे विद्यार्थी मागे का, या प्रश्नातून आमचे मार्गदर्शक कै. अरुअप्पा जोशी यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये स्पर्धा परीक्षा अकादमीचे स्वप्न पाहिले होते. इथले जिल्हाधिकारी, अधिकारी तयार व्हावेत, असे स्वप्न रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांनी पाहिले होते. त्यामुळेच त्यांच्या नावाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी सुरू केली. अकादमीचा उद्देश आता हळूहळू साध्य होऊ लागला आहे. एक वर्षात या अकादमीतून २१ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर नियुक्त झाले आहेत, ही अकादमी चांगले काम करत आहे.
याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल आणि अॅकॅडमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर-मोरे आदी उपस्थित होते.
विविध परीक्षांमध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षण प्रशिक्षण अकादमीतून गोरक्ष जाधव (मोजणीदार), तन्वी पाटील (लेखापाल), शबाना तडवी (कनिष्ठ लिपीक), सिमी धावडे (परिचर), आदिती चव्हाण (पोलिस कॉन्स्टेबल), शांभवी पाटील (स्टेनोग्राफर), प्रज्ञा नार्वेकर (तलाठी), श्रेयस गुरव, धनंजय मगदूम, पवन टेकाळे (अन्वेषक), अजिंक्य सरंगाळे (परिचर), रविंद्र जाधव (आरोग्यसेवक) यांनी यश मिळवले आहे.
याप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी रत्नागिरीमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करण्यात अरुअप्पा जोशी अकादमी यशस्वी झाली आहे. त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी येथे शिकत आहेत. अभ्यासिकेचा उपयोग करत आहेत. तज्ज्ञ व्याख्याते, अधिकाऱ्यांकडून येथे मार्गदर्शन मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना चांगली दिशा देण्याचे काम ही अकादमी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रंथालय सुविधा, अभ्यासिका, व्याख्याने, वाय फाय सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे आवर्जून सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 30-04-2025










