खेड : निधी मंजूर होऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी रस्त्याचे डांबरीकरण अपूर्णच

खेड : शासनाने निधी मंजूर करूनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही अपूर्ण राहिल्याने शिरगाव परिसरातील नागरीक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भोसले म्हणाले, या रस्त्यासाठी शासन निर्णय क्रमांक पीएलएन-२०२२/सी.आर. २३६९/नि-३, दि. २ मार्च २०२२ नुसार रु. ६६ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांचा काळ उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

सध्या भोसलेवाडी ते अदडस वाडीपर्यंत काहीसा रस्ता तयार करण्यात आला असला तरी पिंपळवाडीपर्यंत डांबरीकरण व आवश्यक पुलांचे काम प्रलंबितच आहे. या भागात पावसाचे पाणी पुलावरून वाहत असल्याने एसटी बससेवा बंद होते आणि स्थानिक रहिवाशांना अत्यंत हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. अपुऱ्या आणि खडबडीत रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा धोका पत्करावा लागत आहे.

शासनाने निधी मंजूर करून दिला तरीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काम रखडल्याचे स्पष्ट होते. आमचे मुलांचे शिक्षण, आजारी व्यक्तींची ने-आण व शेतीमालाची वाहतूक यावर गंभीर परिणाम होत आहे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने लक्ष घालून पिंपळवाडीपर्यंत रस्ता डांबरीकरण व मोऱ्यांचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत आम्ही सार्व. बांधकाम विभागाला निवेदन दिले असून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकी योग्य न बनवल्यास याबाबत संबंधितांकडे तक्रार करण्यात येईल, असे श्री. भोसले यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 01/May/2025