लांजा : कुवे येथे होणार शासकीय गोदाम

लांजा : महायुती सरकारच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील कुवे येथे १०८० मेट्रिक टन क्षमतेचे भव्य शासकीय गोदाम बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे गृह (शहरी), महसूल, ग्रामीण व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे गोदाम मंजूर झाले आहे.

लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले आहेत.

आमदार किरण सामंत यांनी आमदारपदाची शपथ घेतल्यानंतर लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना राज्यमंत्री योगेश कदम यांनी साथ दिली. नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत कुवे येथे शासकीय गोदाम बांधण्यासाठी ३ कोटी ४३ लाख ७९ हजार ११० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या गोदामामुळे स्थानिक धान्यसाठ्याची सुरक्षितता आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आमदार किरण सामंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लांजा-कुवे येथील शासकीय गोदाम उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 02/May/2025