लांजा : विद्यार्थ्यांनी क्यू आर कोड तयार करत एकत्रित केली झाडांची माहिती

आसगे : लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेने २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन साजरा केला. येथील विद्यार्थी नेहमीच तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात उपयोग करत असतात. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी क्यू आर कोड (क्कीक रिस्पॉन्स कोड) तयार करत परिसरातील झाडांची माहिती, परसबागेतील पालेभाज्या, फुलझाडांची माहिती एकत्रित केली आहे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना सोबत घेत स्वतः परिसरातील आंबा, पिंपळ, गुलमोहर आदी झाडांसह शालेय परिसरातील शोभेच्या झाडांच्या माहितीचे कोड तयार केले आहेत. हे कोड स्कॅन केल्यावर यात झाड, फुल, फळ, पालेभाज्यांचे चित्र, माहिती, उपयोग यांची माहिती सुलभपद्धतीने मिळत आहे. याचा उपयोग परिसरातील वनस्पतींची माहिती मिळवणे व पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे यासाठी प्रशालेने हा प्रयत्न केला आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, शिक्षिका नेहा पाटोळे, शिक्षक गणेश झोरे, शिक्षिका स्वरा वासुरकर, चेता सावंत, शिक्षक विवेक किल्लेदार, शिक्षिका अक्षता सावंत, लिपिक शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 02/May/2025