संगमेश्वर : एसटी बस न आल्यामुळे धामणी बसथांब्यावर उभ्या असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले, याचा फटका अन्य प्रवाशांनाही बसला. काहींनी खासगी वाहनांमधून प्रवास करणे पसंत केले.
संगमेश्वरमधील पैसाफंड आणि कसबा हायस्कूल येथे जाणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंतची पासधारक मुल सकाळी नऊ वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत धामणी बसथांब्यावर उभे होते; परंतु त्या कालावधीत एकही एसटी बस आली नाही. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरून चालत आलेली बस थांब्यावरच उभी होती.
या ठिकाणी सुमारे ६० ते ६५ मुले उभी होती. काही दिवसांनी सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. नियमित येणाऱ्या बसेस या कालावधीत न आल्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे. अचानक बसेस रद्द होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली असती, तर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना एसटी प्रवासासाठी पास देण्यात आलेला आहे. त्याचे शुल्क एसटी विभागाकडून पूर्वीच भरून घेण्यात आलेले आहे. तरीही त्यांना या प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नवदुर्गा दर्शन, महाड येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्यासाठी पाठवलेल्या बसेस यामुळे काही फेऱ्या सोडण्यात आल्या नसल्याचे एसटी आगारातून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 10/Oct/2024














