संगमेश्वर : परचुरीत लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय संगीत भजन संपन्न

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी लिंगायतवाडी येथे श्री देव सोमेश्वर चंडिका प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित वीरशैव लिंगायत समाज रत्नागिरी जिल्हा मर्यादित संगीत भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिला गटात परचुरीच्या स्थानिक श्री देव सोमेश्वर चंडिका प्रासादिक महिला भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर पुरुष गटात फक्त हरीनाम भजन मंडळ रत्नागिरीने बाजी मारली.

लिंगायत समाजातील तरुण पिढीला भजनाची आवड निर्माण व्हावी, तसेच समाजात उत्तम गायक व वादक तयार व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परचुरी लिंगायतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेला भजनप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शविली.

महिला गटात जय हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ गावमळा यांनी द्वितीय, तर शारदादेवी महिला भजन मंडळ लाडघर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. पुरुष गटात श्री लक्ष्मी पल्लिनाथ प्रासादिक भजन मंडळ पाली यांनी द्वितीय, श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ पाटगाव यांनी तृतीय आणि श्री चंडिका प्रासादिक भजन मंडळ लाडघर यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून बुवा उमेश लिंगायत (रत्नागिरी), उत्कृष्ट कोरस म्हणून श्री लक्ष्मी पल्लिनाथ प्रासादिक भजन मंडळ (पाली), उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून धनंजय लिंगायत (रत्नागिरी), उत्कृष्ट तबला वादक म्हणून प्रणव गुरव (पाली), उत्कृष्ट चकवा वादक म्हणून मयंक लिंगायत (पाटगाव), तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून बुवा अनिल लिंगायत (लाडघर) यांचा गौरव करण्यात आला.

श्री देव सोमेश्वर चंडिका प्रासादिक भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. बुवा गौरव पांचाळ, आनंद लिंगायत आणि प्रसिद्ध पखवाजवादक तुषार परब यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 03-05-2025