रत्नागिरीत उद्या बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा, महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन

गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज यांच्या विद्यमाने बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जन आक्रोश महामोर्चासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाज एकवटणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

जगभरातील सर्व बौद्धांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा यासाठी यासाठी बुद्धगया येथे देश विदेशातील बौद्ध भिक्खू आमरण उपोषणास बसलेले असून बोधगया येथे अनेक दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांच्या बांधवांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय जन आक्रोश महामोर्चा चे आयोजन केले आहे.

हा महामोर्चाला ७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता रत्नागिरी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पायदळ जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीकडे रवाना होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबेल. त्यानंतर जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सादर करणार आहेत. महाबोधी बुद्ध विहारासाठी सन १९४९ झालेला कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या जन आक्रोश महामोर्चातील प्रमुख मागण्या असणार आहेत.

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी या अस्तित्वाच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाचे प्रमुख आयोजक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धार्मिक, सामाजिक राजकीय कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 06/May/2025