Guhagar Power Outage: गुहागरात विजेचा लपंडाव सुरूच; महावितरणच्या उपअभियंत्याकडून ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे

५ ते ६ दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने पाणी योजना आणि बीएसएनएल टॉवर ठप्प; संतापलेल्या लोकप्रतिनिधींचा आंदोलनाचा इशारा

गुहागर:
Guhagar Power Outage | गुहागर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सातत्याने सुरू असून अनेक भागांत तब्बल ५ ते ६ दिवस विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या गंभीर समस्येबाबत महावितरणच्या शृंगारतळी कार्यालयात नुकतेच हजर झालेल्या उपअभियंत्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून वीज ग्राहकांना उडवाउडवीची आणि अजब उत्तरे दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त असून, उपअभियंत्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास त्यांना ‘कोकणी हिसका’ दाखवू, असा इशारा कोतळूकचे उपसरपंच तथा भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी दिला आहे.

५ ते ६ दिवस वीज खंडित; नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त
गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या ५ ते ६ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामीण भागातील पाणी योजना पूर्णपणे बंद पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याशिवाय, वीज नसल्याने परिसरातील बीएसएनएल टॉवरही बंद पडले असून संपूर्ण संपर्क यंत्रणा तुटल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्राहकांची महागडी विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान होत आहे.

“मी लाईन फॉल्ट काढायला जाऊ काय?” उपअभियंत्याची अजब उत्तरे
कोतळूक भागातही मंगळवारी असाच प्रकार सुरू असल्याने, उपसरपंच सचिन ओक यांनी शृंगारतळी कार्यालयातील उपअभियंत्यांशी अधिकृत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. “सतत ३ दिवस एकसारखा विद्युत पुरवठा खंडित का होत आहे? लाईन फॉल्ट का होत आहे?” अशी विचारणा केली असता, उपअभियंत्याने “मी लाईन फॉल्ट काढायला जाऊ काय? तुमच्या लाईनमनला विचारा, विद्युत पुरवठा खंडित का झाला आहे. १०० जणांना मी हेच सांगू काय?” अशी उद्धट उत्तरे देऊन फोन कट केला. त्यानंतर वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नसल्याचे ओक यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; कामकाजात सुधारणा करण्याची सूचना
महावितरणच्या या बेजबाबदार वर्तणुकीनंतर सचिन ओक यांनी तात्काळ महावितरणचे गुहागर अभियंता सूद यांच्याशी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती दिली आणि तीव्र संताप व्यक्त केला. यासोबतच पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनाही या प्रकाराबाबत अवगत करण्यात आले. या तक्रारीची दखल घेत उपसभापती नीलेश सुर्वे यांनी संबंधित उपअभियंत्यांना समज दिली असून, महावितरणच्या कामकाजात आणि वर्तणुकीत तातडीने सुधारणा करण्याची सूचना केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 10-07-2026