Janseva Saptah Ajit Pawar: अजित पवार जयंतीनिमित्त २२ जुलैपासून ‘जनसेवा सप्ताह’; विविध सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

२२ ते २८ जुलै दरम्यान होणार विविध कार्यक्रम; वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि महिला सक्षमीकरणावर भर

रामपूर:
Janseva Saptah Ajit Pawar | महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त येत्या २२ ते २८ जुलै या कालावधीत ‘जनसेवा सप्ताहाचे’ राज्यभरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि कल्याणकारी उपक्रमांची मोठी मालिका राबवली जाणार आहे, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

‘वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली’ अंतर्गत भव्य वृक्षारोपण
या जनसेवा सप्ताहात पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यादरम्यान ‘वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली’ आणि ‘दादांची दृष्टी, हरित सृष्टी’ या विशेष मोहिमांअंर्तगत प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर वृक्षारोपण केले जाईल. याशिवाय स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाणार आहे.

मोफत आरोग्य तपासणी आणि स्वच्छता अभियान
नागरिकांच्या आरोग्यासाठी या सप्ताहात विविध आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिरे, रोगनिदान शिबिरे आणि मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत ऐतिहासिक गड-किल्ले, महापुरुषांची स्मारके, एसटी स्टँड आणि इतर सार्वजनिक स्थळांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जाईल. तसेच आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रमही राबवले जाणार आहेत.

महिला सक्षमीकरण आणि शेतकरी सन्मान उपक्रम
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘अजितदादा महिला सशक्तिकरण पुरस्कार’ आणि शेतकरी महिलांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन, शेतकरी समुपदेशन मेळावे, फलोत्पादन आणि फुलशेती प्रोत्साहन उपक्रम राबवून ‘अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. यासोबतच ‘युवा संकल्प शिबिर’ आणि अल्पसंख्याक समुदायासाठी विशेष सेवा उपक्रमही या सप्ताहाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुका, जिल्हा, जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समिती विभागात या जनसेवा सप्ताहाचे नेटके आयोजन करावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि आमदार शेखर निकम यांनी संयुक्तपणे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 10-07-2026