गुहागर : शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. गुहागर तालुक्यातील कचरा संकलन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नागरी सुविधा घटक योजनेंतर्गत ८ नवीन घंटागाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या घंटागाड्यांच्या माध्यमातून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमधील ओला व सुका कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात वेलदूर, अंजनवेल, पाटपन्हाळे, पालशेत, अडूर, वेळणेश्वर, पडवे आणि कोतळूक या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ९० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. प्लास्टिक कचऱ्याची समस्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे या घंटागाड्यांमधून प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. याव्यतिरिक्त, गावांची स्वच्छता राखण्यासाठी सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. नागरी सुविधा घटक योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी जनगणनेनुसार तीन हजार किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
या घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याची सोय असेल. एका घंटागाडीची किंमत ८ लाख ४३ हजार रुपये असून, त्यातून एका वेळी सुमारे ७५० किलो कचरा वाहून नेता येणार आहे. ग्रामपंचायतींना या गाडीच्या खरेदीसाठी केवळ १० टक्के रक्कम (सुमारे ८४ हजार रुपये) भरावी लागणार आहे, तर उर्वरित ९० टक्के रक्कम जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ‘नावीन्यपूर्ण’ निधीतून अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या गाड्यांचे वितरण संबंधित ग्रामपंचायतींना केले जाईल.
कचरा संकलनानंतर ग्रामपंचायतींना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘नाडेप’ पद्धतीने कंपोस्ट खत (खत) तयार करावे लागणार आहे. यासाठी विशिष्ट आकाराच्या टाकीत ओला कचरा जमा करून तो कुजवला जाईल. तर, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पुढील प्रक्रियेसाठी योग्य कंपन्यांकडे पाठवले जाईल. या नवीन उपक्रमामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मोठी मदत होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 10/May/2025
