चिपळूण नगरपालिकेचा आपत्कालीन आराखडा तयार

चिपळूण : शहरात अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता लक्षात घेता, चिपळूण नगरपालिकेने आतापासूनच सावधगिरीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यासाठी नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक विस्तृत आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, पूरप्रवण क्षेत्रे आणि नागरिकांच्या निवाऱ्यासाठी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी फायबर होडी, यांत्रिक होडी यांसारखे आवश्यक साहित्यही सज्ज ठेवण्यात आले आहे.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे हे नोडल अधिकारी म्हणून या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

पूरप्रवण क्षेत्रे निश्चितः २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या विनाशकारी अनुभवानंतर, प्रशासनाने या संदर्भात अधिक सतर्कता दाखवली आहे. शहरात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या आराखड्यांतर्गत चिपळूण शहरातील बाजारपेठ भाग, पेठमाप, गोवळकोट, मुरादपूर, शंकरवाडी, मार्कंडी, चिंचनाका व वडनाका परिसर, एस.टी. स्टँड आणि पागमळा परिसर ही पूरप्रवण क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.

आपत्कालीन कक्ष स्थापनः नगर परिषद कार्यालयात एक विशेष आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक एकत्रित करण्यात आले असून, १ जून २०२५ पासून कोणत्याही कर्मचाऱ्याला दीर्घकाळ रजा घेण्यास किंवा मुख्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या पाळ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यासोबतच, शहरातील तरणपटू युवकांची यादी तयार करण्यात आली असून, पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यांना तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

आवश्यक सामग्री उपलब्धः नगरपालिकेने १२० लाईफ जॅकेट, १० रबरी ट्यूब, ११० बोये आणि १७ दोरखंडांचे बंडल यांसारखे आवश्यक साहित्य खरेदी केले असून, ते शहरातील १४ प्रभागांमध्ये नागरिक आणि संस्थांसाठी वितरित करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी नगरपालिकेच्या मालकीच्या ४ यांत्रिक फायबर होडी आणि भाड्याने घेतलेल्या २ अशा एकूण ६ बोटी उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त, नगरपालिकेकडे ५ बिगर यांत्रिक होड्याही आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूनही काही बचाव साहित्य प्राप्त झाले आहे.

सायरनद्वारे सतर्कतेचा इशाराः शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्यास, सावधानतेचा इशारा म्हणून नगर परिषद कार्यालयातून सायरन वाजवला जाईल. शहरातील महत्त्वाच्या ७ ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तेथील पाण्याच्या पातळीची माहिती नियंत्रण कक्षाला देतील.

पाणी निचऱ्यासाठी उपाययोजनाः शहरात पावसाचे पाणी सहजपणे वाहून जाण्यासाठी एकूण १७ किलोमीटर लांबीच्या गटारांची जेसीबी मशीनद्वारे साफसफाई करण्यात आली आहे. जिथे मशीन पोहोचू शकत नाही, तेथे सफाई कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात आली आहे. गटारे आणि नाल्यांमधील प्लास्टिक, कपडे, झाडांची पाने आणि झुडपे काढून सांडपाणी व्यवस्थितरित्या वाहून जाईल याची काळजी घेण्यात आली आहे.

एकंदरीत, चिपळूण नगरपालिकेने अतिवृष्टी आणि संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक तयारी केली असून, प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर असल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 13/May/2025