चिपळूण : डेरवणमध्ये राज्यस्तरीय कॅडेट, ज्यूदो स्पर्धांना प्रारंभ

चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या ५३५ मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनने केले असून, रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूदो संघटनेचे सहकार्य लाभले आहे.

डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल यांच्या विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू राज्याच्या संघात निवडले जाऊन ते राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतील. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक, अॅड. धनंजय भोसले, छत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ मल्लखांबपटू शांताराम जोशी, डेरवण क्रीडा विभागाचे संचालक श्रीकांत पराडकर, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी राज्यातील २८ जिल्ह्यांतून ५३५ खेळाडूंच्या वयोगट १५ ते १८ वर्षांखालील कॅडेट गटात १४४ मुले आणि १२९ मुली, तर वयोगट १५ ते २१ वर्षांखालील ज्युनिअर गटामध्ये १४५ मुले आणि ११७ मुली सहभागी झाल्या आहेत. मुंबईचे प्रमोद मॅडन यांची स्पर्धा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 11/Oct/2024