रत्नागिरी : गावडेआंबेरे पूल वर्षभरात वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

पावस : मागील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावडेआंबेरे सातपऱ्यावरील पुलाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे वर्षभरात पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन वर्षांपूर्वी बुडीत क्षेत्र कार्यक्रमांतर्गत आठ कोटीचा निधी या पुलाच्या बांधकामाकरिता मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बांधकामाला सुरुवात करण्यात आली. ठेकेदाराने अर्धवट स्थितीत काम सोडल्यामुळे दोन वर्षांत कोणतेही काम झाले नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर मागील वर्षी पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले. त्यातील गावडेआंबेरे भागातील भरावाचे काम पूर्णत्वास गेले; परंतु नातुंडे भागातील भरावाचे काम जूनमध्ये अर्धवट स्थितीमध्ये झाले. त्यामुळे रस्ता वाहतुकीला सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु नातुंडे भागातील भरावाचे काम अर्धवट स्थितीत झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकला नाही.

मुख्य पुलाच्या संरक्षक कठड्याचे व भरावाच्या बाजूचे बांधकाम न झाल्याने पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याबद्दल परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात आली; परंतु यावेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ऑक्टोबरमध्येच मुख्य पू लाचा संरक्षक कठड्यांचे व मुख्य जोडणी याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा यंदा हा पूल वाहतुकीस खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 11/Oct/2024