संगमेश्वर : गडनदीतील गाळ उपसाला सुरुवात

संगमेश्वर : तालुक्यातील आरवली गावासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, गडनदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला गुरुवारी औपचारिक सुरुवात झाली. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आरवलीसह आसपासच्या गावांना बसणाऱ्या पुराच्या झटक्याला मोठा अंमल बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

गडनदीला पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे आरवली गावात दरवर्षी शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. ही समस्या लक्षात घेऊन गावचे सरपंच निलेश भुवड, माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे यांच्यासह गावातील इतर ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. आमदार निकम यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत ही मागणी मंजूर करून घेतली.

गुरुवारी गाळ उपशाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून, सध्या आरवली पुलाजवळ गाळ उपसा सुरू आहे. येत्या काही दिवसांत भुवडवाडीपर्यंत हे काम वाढवले जाणार आहे. यामुळे आरवली व ब्राह्मणवाडी परिसराला पूराचा फटका कमी बसणार असून, शेतीच्या नुकसानीलाही आळा बसेल, अशी ग्रामस्थांची आशा आहे.

या कामाच्या प्रारंभप्रसंगी सरपंच निलेश भुवड, नाना कांगणे, समीर पाटणकर, उमेश लघाटे, संजय लघाटे, ओंकार पाटणकर, बाबा लघाटे, प्रवीण साठे, महेश पाटणकर, संतोष रानडे, प्रसाद पाटणकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी हा उपक्रम वेळेत सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार शेखर निकम व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 17/May/2025