रत्नागिरी : रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची जागरुकता करण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलीसांतर्फे वाहतूक जागरुकता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी रत्नागिरी जेलनाका रोड येथे बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जनजागृती करण्यात आली. यावेळी रस्त्यावर चक्क यमदूत फिरताना दिसत होता. नियम पाळा अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे असेच जणू सांगत होता.
त्याची भारदस्त शरीरयष्टी, खांद्यावर गदा आणि अंगावर काळा ड्रेस पाहून लहान मुलेही घाबरत होती. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात येत होते. वाहतुकीचे नियम पटवून देण्यात येत होते. झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा, हेल्मेट घाला, जीव वाचवा, वाहन चालवा सावधपणे, घरी जा सुरक्षितपणे, फुटपाथचा वापर करा, धावत्या वाहनांच्या मार्गापासून दूर रहा, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण, वेग मर्यादा पाळा, आयुष्य टिकवा, सिटबेल्टचा वापर करा, मद्यपान टाळा अशा प्रकारे वाहतुकीचे नियम दर्शवणारे पॅप्लेट वाहन चालकांना देण्यात येत होते.
यावेळी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 12-06-2025
