UPI Changes: UPI शी निगडीत मोठे बदल.. जाणून घ्या सविस्तर…

UPI Transaction: यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवणं आता आणखी वेगवान होणारे. एनपीसीआयनं व्यवहाराची वेळ कमी केली आहे. आता केवळ १० सेकंदात पेमेंट केलं जाणार आहे. सोमवार, १६ जूनपासून हा बदल लागू करण्यात आलाय.

यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल. तसंच, आता यूपीआय अॅपवरून दिवसातून ५० वेळा लोक आपला बॅलन्स तपासू शकणार आहेत.

यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक अशी प्रणाली आहे जी मोबाइलवरून त्वरित पैसे पाठवू शकते. एनपीसीआयनं ही घोषणा केली आहे. एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही संस्था देशातील डिजिटल पेमेंटचं कामकाज पाहते.

अनेक प्रकारचे बदल

एनपीसीआयने एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, पैसे पाठवणं, स्टेटस चेक करणं आणि रिफंडसारख्या गोष्टी आता जलद होतील. पूर्वी यासाठी ३० सेकंद लागायचे, परंतु आता हे काम १० ते १५ सेकंदात होईल. हा बदल ग्राहकांनाही आवडेल आणि त्यांचा अनुभव उत्तम होईल, असं एनपीसीआयनं म्हटलं. १६ जूनपासून UPI ​​पेमेंटमध्ये अॅड्रेस व्हेरिफाय करण्यासाठी देखील कमी वेळ लागेल. पूर्वी १५ सेकंद लागायचे, आता फक्त १० सेकंद लागतील, असंही सांगण्यात आलं.

एनपीसीआयनं आणखी एक गोष्ट सांगितली आहे. आता ग्राहक त्यांच्या UPI अॅपवरून दिवसातून ५० वेळा त्यांचा बॅलन्स तपासू शकतील. पूर्वी बॅलन्स तपासण्याची कोणतीही मर्यादा नव्हती. पण, आता तुम्ही दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स तपासू शकता.

का लावण्यात आलं लिमिट?

एका तज्ज्ञाने सांगितले की, पूर्वी कोणतीही मर्यादा नव्हती. परंतु, ही मर्यादा सिस्टम नीट ठेवण्यासाठी लादण्यात आली आहे. त्यांच्या मते, ‘आतापर्यंत एका दिवसात खात्यातील शिल्लक तपासण्याची कोणतीही मर्यादा नव्हती आणि प्रणालीगत कार्यक्षमता लक्षात घेऊन ५० ची मर्यादा सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सिस्टम योग्यरित्या चालवणं आवश्यक होतं. एकंदरीत, UPI द्वारे पेमेंट करणं आता आणखी सोपं आणि जलद होईल. NPCI नं ग्राहकांच्या सोयीसाठी हे बदल केले आहेत. यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 17-06-2025