खानूत बिबट्याची दहशत कायम, महामार्गालगतच्या वस्तीत घुसून कुत्र्याला केले ठार; थरार सीसीटीव्हीत कैद!

खानू (सागर पाखरे): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावाच्या हद्दीत, भरवस्तीत बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महामार्गालगत असलेल्या एका घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यांवर मध्यरात्री हल्ला करून बिबट्याने एका कुत्र्याला ठार मारले, तर दोन कुत्र्यांना जखमी केले. हा संपूर्ण थरार घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत चौथ्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्याने आणि थेट वस्तीत येऊन हल्ला केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खानू येथील सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांच्या घराबाहेर रात्री दोन कुत्रे बसले होते. मध्यरात्री साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला. श्री. आयरे यांनी तात्काळ घराबाहेर येऊन पाहिले असता, एक कुत्रा जखमी अवस्थेत विव्हळत होता, तर दुसऱ्या कुत्र्याला बिबट्या जबड्यात धरून घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जखमी कुत्र्यावर तातडीने उपचार केले.

यानंतर श्री. आयरे यांनी घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात बिबट्या येताना, कुत्र्यांवर हल्ला करताना आणि एका कुत्र्याला उचलून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होते. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने अशाच प्रकारे हल्ला करून एका कुत्र्याला ठार मारले होते. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त

Infigo Eyecare

“यापूर्वीही आम्ही वनविभागाला याबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना करण्याऐवजी आम्हालाच फटाके वाजवून बिबट्याला पळवण्याचा सल्ला दिला,” अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष आयरे यांनी दिली. वनविभागाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

जंगलतोडीचा परिणाम

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि परिसरात झालेली बेसुमार जंगलतोड यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्यांसारखे प्राणी आता मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. खानू गावातील हा परिसर मुख्य मानवी वस्तीचा असल्याने बिबट्याच्या या वावराने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.

पिंजरा लावण्याची मागणी

“वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे आमच्या मुलाबाळांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने आता वेळ न घालवता तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा,” अशी जोरदार मागणी खानू गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 20-06-2025