Ratnagiri rain: पहिल्याच मान्सूनच्या पावसात रत्नागिरी शहराची दाणादाण, फगरवठार येथे ७० फूट संरक्षक भिंत कोसळली

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;?brp_del_th:null;?brp_del_sen:null;?delta:null;?module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;

रत्नागिरी: रत्नागिरी मुसळधार पाऊस सक्रिय होताच सोमवार रात्रीपासून कोसळलेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने संपूर्ण रत्नागिरी शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे मंगळवारी पहाटेपासूनच शहरातील जनजीवन पूर्णपणे दाणादाण उडाले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, दरडी ढासळणे यांसारख्या दुर्घटना घडल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने पावसाळापूर्व कामांचे दावे केले जात असतानाच, अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि चिखल पसरल्याने स्थानिक नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्हाभरातच या दमदार पावसाला प्रारंभ झाला असून वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण व शहरी भागांत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

फगरवठार येथे ७० फूट संरक्षक भिंत ढासळली, वाहतूक बंद

शहरातील मधला फगरवठार येथे मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. येथील संरक्षक भिंतीच्या खालील बाजूची माती मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचली. परिणामी, सुमारे ७० ते ८० फूट लांब असलेली संरक्षक भिंत प्रचंड आवाजासह कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, मधला फगरवठारकडे जाणारा मुख्य रस्ता आता अत्यंत धोकादायक बनला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला आहे.

या कोसळलेल्या दरडीच्या अगदी खालच्या बाजूला मोठी लोकवस्ती असल्याने आता खालच्या फगरवठार परिसरातील घरांना तीव्र धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या वतीने स्थानिक नागरिकांना सतर्कतेच्या आणि खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

७ तास युद्धपातळीवर काम; वीजपुरवठा पूर्ववत

फगरवठार येथे रस्ता आणि संरक्षक भिंत कोसळल्यामुळे शेजारी असलेले आंब्याचे एक मोठे झाडही मुळासकट उन्मळून पडले. हे झाड थेट विजेच्या वाहिन्यांवर कोसळल्यामुळे येथील विजेच्या तारा तुटल्या आणि मधला व वरचा फगरवठार परिसराचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून नगर परिषद प्रभाग १ चे नगरसेवक व पाणी सभापती निमेश नायर यांनी सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत स्वतः घटनास्थळी ठाण मांडले होते. त्यांनी महावितरण आणि नगर परिषदेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी तब्बल ७ तास युद्धपातळीवर काम करून अखेर ते झाड बाजूला केले आणि परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला.

महामार्गाच्या अर्धवट कामामुळे घरात घुसला चिखल; लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी

शहरालगतच्या परवटवणेकडे जाणाऱ्या परिसरात मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. या अर्धवट कामामुळे पावसाच्या पाण्यासोबत प्रचंड चिखल वाहून थेट खालचा फगरवठार परिसरात घुसला. येथील स्थानिक रहिवासी पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात हा चिखल मोठ्या प्रमाणावर साचल्याने नागरिकांचे हाल झाले. महामार्गाच्या या अर्धवट रस्त्यामुळे परिसरातील काही घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीत स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांचे फोन उचलणे टाळल्याने रहिवाशांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधला. या संकटसमयी लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या भूमिकेबद्दल जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कर्ला-आंबेशेत येथे दरड; झाडगाव आणि मारुती मंदिर परिसरात पाणीच पाणी

शहरातील इतर भागांतही पावसाचा फटका बसला असून कर्ला-आंबेशेतकडे जाणाऱ्या जीजीपीएस हायस्कूलच्या मागील रस्त्यावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. मात्र, वाहतूक एका बाजूने सुरू राहिल्याने मोठा खोळंबा टळला. दुसरीकडे, झाडगाव येथे आंब्याचे एक मोठे झाड थेट मुख्य रस्त्यावर आडवे पडल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक यंत्रणेला दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हे झाड रस्त्यावरून हटवण्यात यश आले.

याशिवाय, मारुती मंदिर स्टेडियममागील भाजी मार्केटजवळ पालिकेने यंदाही गटारे साफ न केल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसात येथील रस्ता आणि गटार एक झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचले. शहरातील रामआळी भागातही पहाटेच्या वेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र दुपारनंतर पाऊस ओसरल्याने येथील पाण्याचा निचरा झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 24-06-2026