माखजन : गतवर्षी १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २० टक्के अनुदानाचा टप्पा देण्याचा शासन निर्णय झाला व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला. संबंधित निर्णय होऊन आठ महिने व तिसरे अधिवेशन सुरू झाले तरी निधीची तरतूद झालेली नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतो असे आश्वासित केले आहे.
चालू अधिवेशनात ३० जून रोजी सुमारे ५८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या. शासन निर्णयानंतर तिसऱ्या अधिवेशनातदेखील तरतूद न झाल्याने शिक्षकवर्गात असंतोष आहे. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आमदारदेखील आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्प्यासाठी निधी देण्यासाठी तत्काळ बैठक आयोजित करा असे सांगत सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
यावेळी शिक्षक व पदवीधर आमदारांनी, तिसरे अधिवेशन सुरू होऊन देखील निधीची तरतूद न झाल्याने राज्यातील सुमारे ७० हजार शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याची स्थिती सांगितली. या शासन निर्णयाच्या अमलबाजवणीसाठी शिक्षक भरपावसात आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या बॅनरखाली आंदोलन करत असल्याचे पुन्हा निदर्शनास आणून दिले. या सर्व गंभीर बाबींवर मुख्यमंत्र्यांना शिक्षक व पदवीधर आमदारांसोबत तत्काळ बैठक घ्या व यातून मार्ग काढा असे शिक्षक व पदवीधर आमदारांकडून सांगण्यात आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतो असे शिक्षक व पदवीधर आमदरांना आश्वासित केले.
आता राज्यातील व आझाद मैदानावर बसलेल्या तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांच्या बैठकीकडे लागले आहे. यावेळी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, आ. ज. मो. अभ्यंकर, आ. किरण सरनाईक, आ. जयंत आसगावकर, आ. सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:26 PM 05/Jul/2025












