UPI व्यवहाराबाबत नवा नियम, आता 5,00,000 रुपयांपर्यंत करता येणार डिजिटल पेमेंट!

नवी दिल्ली : सध्या देशात यूपीआय ट्रान्जेक्शनचे (UPI Transaction) प्रमाण वाढले आहे. सध्या स्मार्टफोनचे प्रमाण वाढल्यामुळे यूपीआयच्या ट्रान्जेक्शनच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आजकाल प्रत्येकजण छोठे-मोठे आर्थिक व्यवहार तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर करत आहेत.

एखाद्या मोठ्या दुकानापासून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या दुकानापर्यंत प्रत्येकाकडे आज यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोड लावलेला असतो. मात्र यूपीआयचे व्यवहार करण्यासाठी असलेली डेली लिमीट अनेकांसाठी अडचणीचा विषय ठरत होती. तशी तक्रार अनेकजणांकडून केली जात होती. यावरच आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक मोठा निर्णय घेतला 16 सप्टेंबरपासून यूपीआयच्या रोजच्या व्यवहारात वाढ करण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये बदल करण्याचे आरबीआयचे संकेत

एनपीसीआयने (National Payments Corporation of India) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्देशानुसार 16 सप्टेंबरपासून अनेक भागांत यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑगस्ट रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आरबीआयने यूपीआयच्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचे संकेत दिले होते. आता हा याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय अॅप, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्वांनी आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करावे, अशी सूचनाही यूपीआयने केली आहे.

आता पाच लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार नव्या नियमानुसार आता कर भरण्यासाठी (Tax Payment) यूपीआयच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत ट्रान्जेक्शन करता येणार आहे. रुग्णालयाचे बील (Hospital Bill), शैक्षणिक संस्थांची फी (Educational Fees), आयपीओ (IPO) आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स (Retail Direct Schemes) या सारख्या व्यवहारांसाठीही आता 5 लाख रुपयांचे यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.

एनपीसीआयने याआधी डिसेंबर 2021 आणि डिसेंबर 2023 मध्ये यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत बदल केला होता. सध्या एनपीसीआयने एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय यूपीआय सर्कलच्या (UPI Circle) माध्यमातून करण्यात आली आहे.

बँकादेखील व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकणार

सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या यूपीआय ट्रान्जेक्शनवर एका दिवसासाठी एक लाख रुपयांची ट्रान्जेक्शन लिमीट आहे. असे असले तरी प्रत्येक बँक स्वत:ची अशी व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकतात. अलाहाबाद बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा 25,000 रुपये आहे. है. तर एचडीएफसी बँक (HDFC Bank) आयसीआयसीआय बँकेची (ICICI Bank) यूपीआय व्यवहाराची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. कॅपिटल मार्केट, कलेक्शन, विमा, परदेशी व्यवहार (Foreign Inward Remittances) यासाठी ही मर्यादा प्रत्येक दिवसासाठी दोन लाख रुपये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:12 16-09-2024