रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे दिले जाणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात उत्कृष्ट खेळाडू एक महिला, पुरुष, दिव्यांग खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला थेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील २०२१-२२. २०२३-२४, २०२४-२५ या कालावधीतील उत्कृष्ट खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचा आज (ता. १५) मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शकासाठी मान्यताप्राप्त क्रीडाप्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, तसेच राज्य व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळवणारे खेळाडू घडवणारा मार्गदर्शक यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष, दिव्यांग) यासाठी मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरिष्ठ-कनिष्ठ शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गुणवंत खेळाडू पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूला जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यांना मिळाले पुरस्कार
जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे : धनुर्विद्या क्रीडाप्रकारासाठी मार्तंड संजय झोरे, ईशा केतन पवार व खो-खो खेळासाठी श्रेया राकेश सनगरे, पायल सुधीर पवार, कॅरम खेळासाठी आकांक्षा उदय कदम, योगासनासाठी प्राप्ती शिवराम किनरे यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात येणार आहे. मल्लखांब क्रीडाप्रकारासाठी रणवीर अशोक सावंत, जलतरणासाठी महेश शंकर मिल्के यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 15/Aug/2025












