चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ च्या रखडलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या महामार्ग संबंधित गंभीर समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी अग्रीमा महिला संघ रत्नागिरीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ६ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे भेट घेत निवेदन सादर केले. महामार्ग अधिक रखडल्याने प्रवासी, परिसरातील व्यावसायिकांना होत असलेला त्रास तसेच निकृष्ट बांधकामामळे कायमचा असुरक्षित झालेला महामार्ग ही गंभीर चिंतेची बाब असून या महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जावे, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, परशुराम घाटासारख्या भागांसाठी महामार्गावरील सर्व टेकड्या व उतार स्थिरीकरण कामांची गुणवत्ता, भूभागाची संरचनात्मक अखंडता व दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करावी, राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाट (खेड तालुका) येथे तांत्रिकदृष्ट्या सक्षम वेग नियंत्रण प्रणालीची तातडीने व्यवस्था करावी, परशुराम घाटावर, महामार्गावर शाळेच्या बसेस शाळेकडे वळतात त्या जंक्शनवर एक वाहतूक चौक प्रस्तावित आहे. या मार्गावर मोठ्या कंटेनर व ट्रकसह अवजड वाहनांची संख्या जास्त असते. परशुराम घाटाच्या नैसर्गिक चढ-उतारामुळे बाहने वेगाने येतात. ज्यामुळे या भागात अपघातांचा धोका वाढतो. विद्याथ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन महामार्गावर एक उड्डाण पूल बांधण्यात यावा किंवा पर्यायी सुरक्षा उपाययोजना लागू करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर एकूण १७८ बांधकामे उभारण्यात आली आहेत.
ज्यामध्ये ४९ मोठे पूल, ७१ लहान पूल, ४५ अंडरपास, १२ उड्डाणपूल आणि १ बोगदा यांचा समावेश आहे. या कामांची तसेच या महामार्गाशी संबंधित इतर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी तत्काळ एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी, वृक्षारोपण उपक्रमात कमालीची अनास्था असून वृक्ष लागवड व देखभाल प्रक्रियेत मोबदला देऊन संबंधित गावातील महिला बचत गटांना जोडून घेण्यात यावे, महामार्गाच्या बांधकामाची परिस्थिती व गांभीर्य पाहता केंद्र सरकारने या महामार्गाच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पुन्हा या समस्यांची सत्यता दर्शवणारी कागदपत्रे, फोटो व चित्रफिती इत्यादी पुरावे स्वीकारण्यास मंत्रिमहोदयांनी नकार दिला; मात्र या महामार्गाचे तांत्रिक सल्लागार श्री. टेंग-नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी पीडब्ल्यूडी श्री. शेलार यांच्याकडे आपण पाठपुराव्याच्या कामी संपर्क साधावा, असा त्यांनी सल्ला दिला व कृतीचे आश्वासन दिले. या चर्चेमध्ये अग्रीमा संघाच्या निमंत्रक शामल कदम, अध्यक्षा स्वाती साळवी, कार्याध्यक्षा मुस्कान अडरेकर व सचिव मानसी भोसले यांनी सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 16/Aug/2025














