राज्यातील वाघांची होणार नोव्हेंबरमध्ये गणना

नागपूर : राखीव आणि संरक्षित क्षेत्रात चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना देशातील १८ राज्यात होणार आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा श्रीगणेशा होणार आहे. तत्पूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात २०२६ च्या व्याघ्र गणनेच्या दृष्टीने तयारी सुरू होणार आहे. ही गणना तीन टप्प्यात केली जाणार आहे.

देशात २०२२ मध्ये झालेल्या प्रगणनेनुसार देशात वाघांची संख्या तीन हजार १६७ इतकी नोंदविण्यात आली होती. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच व्याघ्रगणना करण्यात आली होती. सलग सहाव्यांदा त्याच पद्धतीने व्याघ्रगणना केली जाणार आहे. ही गणना नेमकी कशी करायची, त्यासाठीची पद्धतीचे अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षणही दिले जाईल. ऑगस्ट महिन्यात मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिल्या टप्प्यात छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील सर्वच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपसंचालक आणि साहाय्यक वनसंरक्षक सहभागी होणार आहे.

प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर प्रशिक्षक त्यांच्या क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणानंतर अखेरच्या टप्प्यात क्षेत्रीयस्तरावर प्रत्यक्ष व्याघ्रगणनेसाठी फेब्रुवारी २०२६ चा मुहूर्त उजाडण्याची शक्यता आहे. त्यात रेषा विभाजनासह माहिती संकलन व त्यानंतर कॅमेरा ट्रॅपिंग केले जाणार आहे. या गणनेतील वाघांची नेमकी आकडेवारी २०२७ च्या व्याघ्रदिनाच्या दिवशी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बिबट्यांचीही होणार गणना
वाघांबरोबरच या गणनेत बिबट्यांची नेमकी संख्याही समजणार आहे. २०१४, २०१८ आणि २०२२ मध्येही बिबट्यांची गणना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे हत्तीचीही गणना करण्यात येणार आहे.

राज्यातील व्याघ्रगणना नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केलेली आहे- श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 16/Aug/2025