रत्नागिरीच्या ‘जलपरी’चा सुवर्णपंचक! साडेआठ वर्षीय आज्ञा शिंदेची विभागीय जलतरण स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

रत्नागिरी, १८ ऑगस्ट : रत्नागिरीची साडेआठ वर्षीय जलतरणपटू कुमारी आज्ञा नयनेश शिंदे हिने स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट २०२५) चिपळूण येथे झालेल्या विभागीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत एकाच स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदके आणि चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावत अभूतपूर्व यश मिळवले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

चिपळूणच्या रामतीर्थ जलतरण तलावावर जिल्हा जलतरण असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कराड आणि सांगली येथील नामांकित जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. ९ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात आज्ञाने उत्कृष्ट कामगिरी करत ५० मीटर बॅकस्रोक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्रीस्टाइल आणि १०० मीटर वैयक्तिक मेडल (आय.एम.) अशा पाचही प्रकारांमध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातली.

या चमकदार कामगिरीमुळे स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या जलतरणपटूस दिली जाणारी प्रतिष्ठेची ‘चॅम्पियन ट्रॉफी’ देखील आज्ञाने पटकावली.

आज्ञाने वयाच्या साडेसातव्या वर्षापासून पोहण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून ती रत्नागिरी क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावावर ‘अ‍ॅक्वा टेक्निक्स स्विमिंग क्लब’ मध्ये राष्ट्रीय जलतरण संस्थेचे (NIS) प्रशिक्षक श्री. विवेक विलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर सराव करत आहे. आपल्या या देदीप्यमान यशाचे श्रेय आज्ञा तिचे प्रशिक्षक विवेक विलणकर सर, तिचे आई-वडील आणि संपूर्ण शिंदे कुटुंबियांच्या खंबीर पाठिंब्याला देते. आज्ञाच्या या चमकदार कामगिरीमुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.