रत्नागिरी, १९ ऑगस्ट:
रत्नागिरी जिल्ह्यावर पुराचे गडद संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी आणि राजापूर येथील कोदवली नद्यांसह जिल्ह्यातील तब्बल सात प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाने आज (मंगळवार) सकाळी ९ वाजता जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगबुडी नदी धोका पातळीच्या अगदी जवळ पोहोचली असल्याने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाच्या ताज्या अहवालानुसार, खेडमधील जगबुडी नदीची धोका पातळी ७.०० मीटर असताना, सध्या ती ६.८० मीटरवर वाहत आहे. ही धोका पातळीपासून केवळ काही सेंटीमीटर दूर असल्याने खेड शहरावर पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, राजापूरमधील कोदवली नदीनेही इशारा पातळी (४.९० मीटर) ओलांडून ७.२५ मीटरची चिंताजनक उंची गाठली आहे, ज्यामुळे राजापूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील इतर नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली आहे. यामध्ये चिपळूणमधील वाशिष्ठी (५.२८ मी.), संगमेश्वरमधील शास्त्री (६.४० मी.) व बावनदी (९.४५ मी.), आणि लांजा तालुक्यातील काजळी (१६.७८ मी.) व मुचकुंदी (२.८० मी.) या नद्यांचा समावेश आहे.
पाटबंधारे विभागाच्या या अहवालानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, आपली मालमत्ता आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 19-08-2025












